favorite
close
bekwtrust.org /marathi
चमत्कार
कृपेची बरसात:

तो १९८१ चा काळ होता. पीर–व–मुर्शिद आपल्या गावी गोरखपूर येथे होते. जून चा महिना उजाडला होता. पण अजून पावसाचे काहीच चिन्ह दिसत नव्हते. गरमी आणि उकाड्याने सर्वजण हैराण झाले होते. लवकरात लवकर पाऊस पडावा म्हणून सर्वजण ईश्वराची प्रार्थना, तऱ्हेतऱ्हेच्या रिती-रिवाजांचा अवलंब इतकेच काय अजान मधून देखील पावसासाठी प्रार्थना असे सर्व प्रकारचे प्रयत्न सुरु होते. परंतु, आकाशामध्ये पावसाचे काळे ढग दिसण्याचे काहीच चिन्ह दिसत नव्हते.


त्याकाळी पीर–व–मुर्शिद मुंबईतल्या पालिकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून काम करीत होते. उन्हाळी सुटी संपून लवकरच शाळा सुरु होणार होत्या. पीर–व–मुर्शिद यांनी मुंबईला निघायची तयारी सुरु केली होती. गावातून निघण्यापूर्वी त्यांच्या आईने, पाऊस ण पडल्यामुळे शेतकऱ्याला आता कोणत्या दिव्यातून जावे लागणार याचा पाढा वाचून दाखविला. आईला नेमकं काय म्हणायचे आहे, हे पीर–व–मुर्शिद यांना लगेच समजले. त्यांनी आपल्या जुन्या कांबळयाचा एक तुकडा घेतला आणि आपल्या अंगणातील एका झाडावर बांधला. मग ते आपल्या आईला म्हणाले, “जर पाऊस थांबला नाही तर हा कांबळयाचा तुकडा सोडून टाक.” इतके बोलून ते मुंबईसाठी रवाना झाले.


पीर–व–मुर्शिद आता कुठे गोरखपूर स्टेशनात पोहोचत होते, तोच गोरखपूरमध्येच नाही तर संपूर्ण उत्तर प्रदेश राज्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. पुढचे दोन दिवस सलग पाऊस पडत होता. आणि जेव्हा तो बांधलेला कांबळयाचा तुकडा सोडला तेव्हा कुठे पाऊस थांबला. वाह रे ईश्वरा!


केवळ ईश्वरालाच आपल्या अशा पवित्र आणि दिव्य (सुफी संत) मित्रांच्या शक्ती आणि ज्ञानाविषयी माहीत असते. असे सुफी संत जगाला आपल्या शक्तीचे प्रदर्शन न करता ईश्वराच्या दिव्यतेविषयी संपूर्ण जगाला उजागर करीत असतात.

एक रुपयाचे नाणे:

पीर–व–मुर्शिद यांच्या शिष्यांपैकी एक श्री. लतीफ यांच्या अनुभवांवर आधारित हा किस्सा आहे. एक काळ असा होता, जेव्हा लतीफ आपल्या आर्थिक चणचणीमुळे सदैव चिंतीत असत. ते पीर-व–मुर्शिद यांच्या पावित्र घरात बसले होते आणि आपल्या पैशांच्या समस्येबाबत विचार करीत होते. त्याच्या मनात नेमके काय चालू आहे हे पीर–व–मुर्शिद यांनी ओळखले. आणि अत्यंत प्रेमळ आवाजात विचारले, “अरे लतीफ! काय झाले? ………… तुला तुझ्या व्यापाऱ्याची चिंता सतावित आहेस का ? लतीफने पीर–व–मुर्शिद यांच्याकडे पाहिले आणि ते म्हणाले की, "चिंता करू नकोस. मी आहे ना!” आणि मग लतीफच्या मनातील शंका दूर करण्यासाठी पीर–व–मुर्शिद म्हणाले, “तू एका बंगल्याचा मालक होशील. एक दुकान असेल आणि एक फियाट गाडी असेल. तुझ्या समाधानासाठी मी त्या गाडीचा नोंदणीकृत क्रमांक देखील सांगतो. मग पीर–व–मुर्शिद यांनी लतीफ ला त्याच्या भविष्यातील गाडीचा नोंदणीकृत क्रमांक सांगितला – एम ए एच ३८८३, जो लतीफ ने लिहून घेतला.


पीर–व–मुर्शिद यांचे बरेच शिष्य जाणून आहेत की, लतीफचे कुर्ला येथे दुकान असून त्याच्याकडे एम ए एच ३८८३ नोंदणीकृत क्रमांक असलेली एक फियाट गाडी देखील आहे. यावरून एक गोष्ट सहज लक्षात येते की, पीर–व–मुर्शिद यांनी कथन केलेल्या सर्व भविष्यवाण्या खऱ्या झाल्या आहेत.


काही काळ गेला आणि लतीफचे चांगले दिवस उलटू लागले. आणि एक वेळ अशी आली की, त्याच्यावर एकदम सात लाखाचे कर्ज झाले. बॉलिवुड फिल्म सेट व इव्हेंट स्टेज साठी लाकूड पुरविण्याचा व्यवसाय लतीफ करीत असे. फिल्म उद्योगात ज्या ग्राहकांना लाकडे पुरविली होती, ते सर्व दिवाळखोर झाले होते. आणि लतीफ ने ज्यांच्याकडून समान घेतले होते, ते पैशांसाठी लतीफ च्या मागे लागले होते. त्याकाळात सात लाख रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम होती. नेहमी प्रमाणे लतीफ रोज सकाळी पीर–व–मुर्शिद यांच्या घरी जात होते आणि त्यांनी आपली समस्या दूर करावी यासाठी प्रयत्नशील होते. पण पीर–व–मुर्शिद (बाबाजान) त्याला बघून न बघितल्यासारखे करीत असत. असेच काही दिवस गेले, शेवटी एक दिवस असह्य होऊन लतीफ बाबाजानच्या पायांवर डोके ठेवून लहान मुलाप्रमाणे रडू लागला. बाबाजान नी अत्यंत दयाळूपूर्ण नजरेने लतीफ कडे पाहिले आणि आपल्या बटव्यातून एक रुपयाचे नाणे काढले. ते नाणे लतीफला देत म्हणाले की, “हे नाणे तुझ्या बँकेत जमा कर, सारे काही ठीक होईल.". बाबाजानच्या सांगण्या नुसार लतीफने ते नाणे बँकेत जमा केले. आणि पुढे महिन्याभरातच परिस्थिती लतीफला अनुकूल अशी होऊ लागली. एका वर्षाच्या आत लतीफ ने आपले कर्ज पूर्णपणे चुकते केले. नि आज तो एक समाधानी आयुष्य जगत आहे.


लतीफ म्हणतो, “हो, बाबाजान काहीही करू शकतात! फक्त त्या गोष्टींसाठी बाबाजान यांनी सहमत होणे आवश्यक आहे" याप्रकारची उदाहरणे आपल्याला वली-च्या शक्तीबाबत विचार करायला भाग पडतात.

रखरखत्या वाळवंटात सुखाची बरसात

बाबाजान च्या शिष्यांमध्ये एक बसंती नावाची कोळीण होती. ती खूप भोळी भाबडी होती. शिवाय परिस्थिती देखील सामान्य होती. तिला संसारातल्या कोणत्याही गोष्टींचा लोभ नव्हता. कारण जीवनातल्या प्रत्येक क्षणी बाबाजान नी नेहमीच तिला आणि तिच्या परिवाराला मदत केली होती. तिच्या आयुष्यात अशी काही घटना घडली की ती आयुष्यभर बाबाजान ची ऋणी राहिली.

या घटने विषयी सांगताना ती म्हणते, “माझी लहान मुलगी सुमन, तेव्हा ८-९ वर्षाची असेल, ती तापाने खूप फणफणली होती. त्यात उलटी आणि डी – हायड्रेशन मुळे ती एकदम अशक्त होऊन गेली. तिच्यावर डॉक्टरी उपचार चालू होते. पण त्यात काही यश येत नव्हते. कामापायी ती आपल्या या मुलीला आपल्या मोठ्या बहिणीकडे ठेवून जात असे.


एके दिवशी ती जेव्हा कामावरून घरी परतली तेव्हा तिने पाहिले की, तिच्या मुलीला सुमनला जागे करण्याचा प्रयत्न चालू होता. बसंती देखील तिला उठविण्याचा प्रयत्न करीत होती. पण काहीच फायदा होत नव्हता. ती हलतच नव्हती. गेल्या काही दिवसांपासून सुमन धड खात ही नव्हती. कदाचित पोटात काहीच अन्न नसल्यामुळे ती बेशुद्ध झाली असेल, असा विचार बसंती च्या मनात आला.


पुढचा –मागचा कोणताही विचार न करता ती सुमनला घेऊन थेट गोवंडी (मुंबई) ला बाबाजान च्या घरी घेऊन आली. तिने सुमनला बाबाजान च्या पायांवर ठेवले आणि म्हणाली, “गुरुदेव! बघा ना हिला काय झाले आहे ? तिचे डोळेच उघडत नाही आहे ; आणि काही खात पण नाही. तिच्यावर औषधाचा काहीच परिणाम होत नाही आहे. कृपा करून तिला स्वस्थ करा. “बसंती निष्पापपणे बाबाजान यांना सांगत होती. तिला जरा देखील कल्पना नव्हती की तिची सुमन मृत होती. तिच्या त्या मृत शरीराला ती बेशुद्ध असल्याचे समजत होती.


बाबाजान यांनी आपल्या त्या गरीब भोळ्या शिष्येकडे पाहिले. आणि एकदम गहन विचारात बुडाले. त्यांनी मृत सुमनच्या तोंडात पाण्याचे काही थेंब स्वत:च्या हाताने टाकले. आणि हाताने तिच्या छातीवर थोपटू लागले. तिथे जमलेली सर्व मंडळी शांतपणे ते काय अध्यात्मिक उपचार करीत आहे हे पहात होती. काही मिनिटातच सुमनला उचकी लागली आणि तिचा श्वास पूर्ववत सुरु झाला. ते पाहिल्यानंतर पहिल्यांदा बसंतीला जाणीव झाली की, अरे आपली सुमन मृत होती तर.


ती जाणीव होताच बसंती बाबाजान यांच्या पायांवर डोके ठेवून रडू लागली. कारण त्यांनी तिच्या मुलीला नवा जन्म दिला होता. फक्त बसंतीच नाही तर तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू वहात होते. थोडयावेळाने सुमन जेव्हा पूर्ण शुद्धीवर आली, तेव्हा तिला एक सफरचंद देऊन घरी पाठविले.


या घटनेवरून एक गोष्ट सहजपणे लक्षात येते की, बाबाजान यांचा दयाळू स्वभाव आणि माणसांच्या विषयी त्यांच्या मनात असलेल्या प्रेमामुळेच सुमनला एक नवे जीवन प्राप्त झाले. इतर कुणासाठी नक्कीच हे अशक्यप्राय कार्य असते. पण सुमन आणि तिच्या आईसाठी ही नक्कीच अनमोल भेट होती. सुमन आज एक विवाहित स्त्री असून आपल्या आईचा संभाळ करीत आहे.


मानव जाती विषयी असलेल्या या स्वरूपाच्या दिव्य प्रेमातून एक गोष्ट सहजपणे ध्यानात येते कि, ईश्वर हा सर्व शक्तीमान असून काही निवडक मंडळीच्या ( जसे गुरु, संत, फकीर) रुपात तो आपल्यासाठी प्रेम, आशिर्वाद आणि शक्तीचे प्रकटीकरण करतो. एक मात्र नक्की की, या दु:ख, वेदनेने भरलेल्या दुनियेत बाबाजान यांची उपस्थिती म्हणजे आपल्यासाठी रखरखत्या वाळवंटात सुखाची बरसात असल्या सारखे आहे.

अशा अनेक घटना, प्रसंग आहेत कि, जिथे बाबाजान यांच्या पवित्र उपस्थितीमुळे अनेक व्याधीग्रस्तांच्या व्याधी, दुखी लोकांची दु:खे सहजपणे दूर झाली आहेत. या सर्व घटना या वेब साइट वर देणे शक्य नाही. परंतु “आइन-ए-रब" (परमेश्वर का आयना) नावाच्या या पुस्तकामध्ये बाबाजान यांचे जीवन चरित्र रेखाटले आहे. या पुस्तकाच्या प्राप्तीसाठी इच्छुक आमच्या कोणत्याही शाखे ट्रस्टशी संपर्क साधून हे पुस्तक प्राप्त करू शकतात.